सिल्लोड, (प्रतिनिधी) : पालोद येथील खेळणा मध्यम प्रकल्पातून शेतात गाळ वाहतूक करताना ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने त्याखाली दबून अवघ्या १४ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली असून, या अपघातामुळे वांजोळा व परिसरात शोककळा पसरली आहे.
राज सुरडकर (वय १४, रा. वांजोळा, ता. सिल्लोड) असे मृत बालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पालोद येथील खेळणा मध्यम प्रकल्पातून सध्या सुमारे १० ते १५ ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतात गाळ नेत आहेत. राज सुरडकर हा देखील गाळ वाहतुकीच्या कामात ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत होता. प्रकल्पातून गाळ भरून ट्रॅक्टर चढावरून वर येत असताना अचानक ट्रॉली पलटी झाली.
या अपघातात राज ट्रॅक्टरखाली दबून गंभीर जखमी झाला. अपघातानंतर नातेवाईकांनी त्याला तातडीने सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.
अल्पवयीन मुलाचा गाळ वाहतुकीच्या कामादरम्यान हा दुर्दैवी मृत्यू अनेक प्रश्न उपस्थित करणारा ठरला आहे. अशा धोकादायक कामांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग कसा झाला. या घटनेमुळे वांजोळा व पालोद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी रात्री उशिरा सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू दाखल करण्यात आला.













